बीडमध्ये ‘देव कोंडले, त्यांना सोडवा’ अशी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
बीड : मारहाण, चोरी, लूटमार किंवा अन्य तक्रारी पोलीस ठाण्यात न घेतल्यास तक्रारदार थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात दाद मागतात. मात्र चिंचोली माळी (ता. केज) येथील कौटुंबिक कलहातून देव कोंडले, त्यांना सोडवा, अशी तक्रार पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्याकडे करण्यात आली. अनोख्या तक्रारीमुळे पोलिस प्रशासन देखील आश्चर्यचकित झाले असून देवाची मालकी कोणी ठरवायची? असा पेच त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे.
बीड जिल्ह्यातील चिंचोली माळी (ता. केज) येथे ‘विठ्ठला शपथ’ या मराठी चित्रपटातील देव कोंडला गीताला साजेचा प्रसंग अनुभवयास मिळत आहे. अच्युत दिगंबर पवार व त्यांचे कुटुंबीय लहान मुलांना सोबत घेऊन ७ जानेवारी रोजी सायंकाळी उशिरा पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहोचले. नियत्रंण कक्षातील अधिकारी व अंमलदारांनी त्यांच्याकडे विचारपूस केली असता चुलती मनाबाई बबन पवार हिने घरातील देव कोंडले असून ते आम्हाला धार्मिक कार्यासाठी परत हवे आहेत. त्यासाठी पोलिसांनी मदत करावी, अशी मागणी अच्युत पवार व कुटुंबीयांनी केली.
अच्युत पवार आणि त्यांची चुलती मनाबाई पवार या दोन्ही कुटुंबात अनेक दिवसांपासूनचा वाद आहे. कुटुंबात एकत्रित देवाच्या मूर्ती आहेत. मात्र त्या मनाबाई पवार यांच्याकडे असून त्यांनी घरात त्या कोंडल्या आहेत. अच्युत पवार यांच्या कुटुंबातील एका लहान मुलांच्या बारशाच्या कार्यक्रमासाठी मूर्ती हव्या असल्याने त्यांनी मनाबाई यांच्याकडे मूर्ती देण्याची मागणी केली. मात्र त्यांनी नकार दिला. त्यामुळे अच्युत पवार यांनी स्थानिक पोलिसांकडे तक्रार केली. मात्र, दखल घेतली जात नसल्याने त्यांनी थेट पोलीस अधीक्षकांकडे दाद मागितली.
कौटुंबिक कलह थेट देव कोंडण्यापर्यंत गेल्याने पोलीस देखील आश्चर्यचकित झाले आहेत. दोन्ही कुटुंबात अनेक दिवसांपासूनचा वाद असल्याने त्यांनी परस्परविरोधी तक्रारी दिल्या आहेत. आता देव कोंडल्याची तक्रार आहे. मनाबाई पवार या केज तालुक्यातील येडेश्वरी कारखाना परिसरात वास्तव्यास आहेत. मात्र देव चिंचोलीमाळी येथील घरात कोंडून ठेवल्याची तक्रार असल्याने आता देवाची मालकी कोणी ठरवायची? असा पेच पोलिसांपुढे आहे.
दरम्यान, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, सहायक निरीक्षक शरद भुतेकर यांनी पवार कुटुंबाची समजूत घातली असून त्यानंतर केजचे सहाय्यक निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्याशी संपर्क करून त्या कुटुंबीयांना केजला पाठवण्यात आले.
0 Comments