Header Ads Widget


लम्पी रोगांच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधीत केलेली पशूबाजार व गुरांची वाहतूक पुर्वरत सुरु- जिल्हाधिकारी मनीषा खत्री




नंदुरबार ! Nandurbar/LivenationNews 
 


    नंदुरबार जिल्ह्यात लम्पी स्किन डिसीज रोगांच्या प्रादुर्भाव आढळून आल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नियंत्रित क्षेत्रातील  किंवा त्या क्षेत्राबाहेरील गोजातीय प्रजातीची सर्व गुरे व म्हशी यांची ने-आण करण्यास व खरेदी- विक्री व प्राण्याचे बाजार भरविण्यास मनाई करण्यात आली होती. लम्पी चर्मरोग प्रादुर्भावाच्या प्रार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय व तालुकानिहाय आढावा बैठकीत जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर, शहादा व तळोदा तालुक्यातील प्राणी बाजार भरविणे व जिल्हयांतर्गत गुरांची वाहतूक करण्यास पुढील अटी व शर्तीच्या अधिन राहून सुरु करीत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा मनीषा खत्री यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिले आहे.

 जिल्ह्यातंर्गत गुरांची वाहतूक करण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार गुरांचे लम्पी चर्मरोगाकरिता 28 दिवसापुर्वी प्रतिबंधक लसीकरण झालेले असावे. वाहतूक करावयाच्या गुरांची ओळख पटविण्यासाठी गोजातीय प्रजातींच्या कानात टॅग नंबर असणे तसेच इनाफ पोर्टलवर नोंदणी असणे बंधनकारक राहील. संक्रमित नसलेल्या क्षेत्रातून गुरांची वाहतूक करण्यासाठी आवश्यक ते आरोग्य प्रमाणपत्र बंधनकारक असून ते देण्यासाठी राज्य शासनाच्या, जिल्हा परिषदेकडील पशुसंवर्धन विभागातील पशुधन विकास अधिकारी गट -अ पेक्षा कमी दर्जा नसलेल्या अधिकारी यांना सक्षम अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आले आहे.

गुरांची वाहतूक करतांना आरोग्य दाखला तसेच जनावरांची वाहतूक अधिनियम 2001 मधील नियम 47 अन्वये स्वास्थ्य प्रमाणपत्र सोबत बाळगणे आवश्यक राहील. कृषी उत्पन्न बाजार समिती, ग्रामपंचायत, प्रक्षेत्रे व पशुबाजारामध्ये यापुढे टॅगींग व रोग प्रतिबंधक लसीकरणाची खात्री झाल्याशिवाय गुराची खरेदी विक्री करुन नयेत. 

सदर आदेशाचे अंमलबजावणीसाठी पशुसंवर्धन विभाग, पोलीस विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, उप निबंधक, कृषि उत्पन्न बाजार समिती, सहकारी संस्था व अन्य अनुषंगीक प्रशासकीय विभागाने आदेशाचे पालन करावे, असेही आदेशात नमूद केले आहे. 

Post a Comment

0 Comments

|