नंदुरबार ! Nandurbar/ LivenationNews
सध्या देशासह राज्याची राजकीय परिस्थिती पाहता प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आहे. राजकीय घडामोडीत प्रत्येक पक्ष आपलीच भुमिका योग्य असल्याचे स्पष्टीकरण देतो. मात्र, या सार्या प्रकारात राजकीय पक्ष मतदारांना गृहित धरतात. म्हणूनच मतदारांचीही बाजू न्यायालयाकडून ऐकली गेली पाहिजे यासाठी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली असून ती मान्यही झाली असल्याची माहिती पुणे येथील प्रसिद्ध विधीज्ञ ऍड.असीम सरोदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, राज्यात स्थापन झालेले सरकार हे घटनाबाहय असून १५ फेब्रुवारीपर्यंत हे सरकार कोसळेल असे भाकितही त्यांनी यावेळी केले.
ऍड.असीम सरोदे हे न्यायालयाच्या कामकाजानिमित्त नंदुरबारला आले होते. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ऍड.सरोदे म्हणाले, सहा महिन्यांपासून राज्यात सत्तासंघर्ष पहायला मिळत आहे.
या संघर्षात सहभागी असलेला प्रत्येक पक्ष आपलीच बाजू योग्य असल्याचे स्पष्टीकरण देत आहे. मात्र, या सर्व राजकीय पक्षांच्या चिन्हावर निवडून आलेले लोकप्रतिनिधी हे मतदारांच्या जोरावर निवडून आले आहेत. मतदारांनी त्यांना कौल दिला आहे. मात्र, पक्षांनी त्यांना गृहित धरले आहे. ज्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयात या सर्व राजकीय पक्षांची बाजू ऐकली जात आहे तशीच मतदारांचीही एक बाजू आहे. तीदेखील सर्वोच्च न्यायालयाने ऐकली पाहिजे, यासाठी आपण हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. सरन्यायाधिश न्या.चंद्रचूड यांनी ही याचिका मान्य केली आहे. त्यामुळे जनतेलाही यात बाजू मांडता येणार आहे.
ऍड.सरोदे पुढे म्हणाले, राज्यात घटनाबाहय सरकार स्थापन झाले आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ती आता अंतीम टप्प्यात आहे.
जानेवारीच्या अखेरपर्यंत किंवा १५ फेब्रुवारीपर्यंत याचिकेवर अंतीम निकाल लागण्याची शक्यता आहे. कायद्याच्या सर्व बाजू पाहता हे सरकार १५ फेब्रुवारीपर्यंत कोसळेल, असे भाकितही ऍड.सरोदे यांनी केले आहे. यावेळी ऍड.विक्रांत दोरकर उपस्थित होते.
0 Comments