Header Ads Widget


अवैध दारूच्या वाहतूकीवर अक्कलकुवा पोलीस ठाण्याची कारवाई, 28 लाख 95 हजार रुपये किमंतीची बेकायदेशीर विदेशी दारु जप्त.

 

नंदुरबार दि. २८/०१/२०२३.

गुजरात राज्यात दारुबंदी असल्यामुळे महाराष्ट्रातून अवैध दारुची चोरटी वाहतूक होत असते. त्याअनुषंगाने नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने गुजरात विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने महाराष्ट्रातून गुजरात राज्यात होणारी अवैध विदेशी दारुची चोरटी वाहतूकीवर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी गुजरात राज्यात अवैधपणे दारुची वाहतूक करणाऱ्यांची माहिती काढून कारवाई करणेबाबत निर्देश गुन्हे बैठकीत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले.

दिनांक 25/01/2023 रोजी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, अक्कलकुवा पोलीस ठाणे हद्दीतून HR पासिंगच्या पॅक बॉडीच्या कंटेनरमधून गुजरात राज्यात अवैध दारुची वाहतूक होणार आहे, त्या अनुषंगाने त्यांनी सदर माहिती अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. राजेश गावीत यांना सांगितली. अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. राजेश गावीत यांनी अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे एक पथक तयार करुन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करुन कारवाई करणेबाबत आदेशीत केले.

अक्कलकुवा पोलीस ठाण्याच्या पथकाने अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावर अक्कलकुवा पोलीस ठाणे हद्दीतील गुलीउंबर येथील RTO चेक पोस्टजवळ सापळा लावला. दिनांक 25/01/2023 रोजी रात्री 11.50 वा. सुमारास RTO चेक पोस्टजवळ एक तपकिरी रंगाचा टाटा कंपनीचा पॅक बॉडीचा कंटेनर उभा असलेला दिसला, परंतु सदर कंटेनरमध्ये किंवा कंटेनरजवळ कोणीही इसम दिसला नाही. अक्कलकुवा पोलीस ठाण्याच्या पथकाने बराच वेळ त्या कंटेनरवर पाळत ठेवली, परंतु बराच वेळ झाल्यानंतरही कोणीच त्या कंटेनरजवळ आले नाही. म्हणून अक्कलकुवा पोलीस ठाण्याच्या पथकाने वाहनाची पाहणी केली असता त्यात खालीलप्रमाणे दारु आढळून आली

1) 3 लाख 74 हजार 544 रुपये किमंतीचे McDowells No 1 व्हिस्कीचे एकुण 54 खोके, एका खोक्यामध्ये 750 एम.एल. चे 12 बाटल्या, अशा एकुण 1296 बाटल्या. .
2) 3 लाख 36 हजार 960 रुपये किमंतीचे Royal Challenge व्हिस्कीचे एकुण 52 खोके, एका खोक्यामध्ये 750 एम.एल. चे 12 बाटल्या, अशा एकुण 1248 बाटल्या.
3) 6 लाख 84 हजार रुपये किमंतीचे McDowells No 1 व्हिस्कीचे एकुण 95 खोके, एका खोक्यामध्ये 180 एम.एल. चे 48 बाटल्या, अशा एकुण 9120 बाटल्या.
4) 15 लाख रुपये किमतीचे एक तपकिरी रंगाचा टाटा कंपनीचा पॅक बॉडीचा कंटेनर.

असा एकुण 28 लाख 95 हजार 504 रुपये किमंतीचा मुद्देमाल मिळून आल्याने कंटेनर याचेवरील चालकाविरुध्द् अक्कलकुवा पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसेच गुन्ह्यातील ट्रक चालक व संबंधीत संशयीतांना लवकरात लवकर ताब्यात घेण्यात येईल असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांनी सांगितले आहे.

सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. संभाजी सावंत यांचे मार्गदर्शनाखाली अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. राजेश गावीत, पोलीस उप निरीक्षक श्री. रितेश राऊत, पोलीस नाईक अतुल गावीत, गुरुदेव मोरे, खुशाल माळी, किशोर वळवी, देविदास विसपुते, पोलीस अंमलदार अविनाश रंगारे, प्रशांत यादव, राजु मोरे यांच्या पथकाने केली आहे.

Post a Comment

0 Comments

Today is Monday, May 12. | 1:11:37 AM