Header Ads Widget


समाजकार्य महाविद्यालयात “एकदिवसीय आदिवासी विकास कार्यशाळा” संपन्न

मोराणे प्रतिनिधी /प्रकाश नाईक 

मोराणे :- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव  आणि समता शिक्षण संस्था पुणे, संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान, भारत सरकार ( पीएम- उषा ) या अंतर्गत एक दिवशीय आदिवासी समुदाय विकास कार्यशाळा दि. १० ऑक्टोबर २०२४ आयोजित करण्यात आली.



कार्यशाळेचे उद्धघाटन  मा. चैत्राम पवार  यांच्या हस्ते करण्यात आले. मा. चैत्राम पवार यांनी ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ ही संत-महात्म्यांनी आपल्याला दिलेली शिकवण आहे. भारतीय संस्कृती पाहिली तर आपण निसर्ग पूजक समाजात राहतो. आपल्या विविधतेत एकता आहे आणि त्यात सर्वत्र निसर्गपूजन आहे. वृक्षांची पूजा करणे, त्यांचे संगोपन व रक्षण करणे, त्यांना देव मानणे, प्राण्यांची पूजा करणे, त्यांना नमस्कार करणे, त्याचप्रमाणे झाडांचा केवळ औषधी म्हणून वापर करणे हे आपल्या भारतीय संस्कृतीत पूर्वापार चालत आलेले आहे. वनवासी समाजाने नेहमीच या जंगलांचे रक्षण केले आहे, तसेच सेवाही केली आहे व  करत आहेत. पर्यावरण रक्षणासाठी आदिवासी समाज नेहमीच पुढे असतो म्हणजेच  शाश्वत विकासात आदिवासींची भूमिका महत्वाची ठरत आहे असे प्रतिपादन केले. 
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. डॉ. शिवाजी पाटील (व्यवस्थापन परिषद सदस्य -कबचौउमवि, जळगाव) यांनी प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान, भारत सरकार ( पीएम- उषा ) अंतर्गत कवित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव या योजना अंतर्गत 50 कोटी जळगाव विद्यापीठात मिळाले आहेत. त्यातून काही विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी विविध कार्यक्रम घेण्यात येतील   विद्यार्थी कार्यशाळासाठी जास्तीत जास्त  खर्च करणार आहोत त्यातून आपल्या विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी व स्व कल्याण नव्हे तर समाजाचे कल्याण व्हावे हा  उद्देश आहे. आदिवासी जमातीतील आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक परिस्थितीवर मोठ्या प्रमाणावर अभ्यास आणि संशोधने  होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले.

मा. डॉ. शैलेश पटेल (सहाय्यक प्रकल्प अधिकारी, धुळे) यांनी आदिवासी विकास विभाग आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करतो. आदिवासी समाजांना सामुदायिक लाभ दिला जातो. आदिवासींमधील शैक्षणिक विकास व्हावा यासाठी  आदिवासी विकास विभाग मोठया प्रमाणावर काम करत आहे. जल, जंगल, जमीन आणि शाश्वत विकास यावर आदिवासी समाजासाठी आदिवासी विकास भर देत आहे असे मार्गदर्शन केले. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ. विष्णू गुंजाळ (प्राचार्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय, धुळे) यांनी अध्यक्षीय समारोपाची सुरुवात आदिवासी बोलीभाषेतून केली.  आदिवासींच्या समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी सर्व परीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.  आदिवासींच्या मूलभूत गरजा व त्यांच्या चालत आलेल्या पारंपरिक रूढी परंपरा यासाठी आपण  काय करू शकतो हा विचार, आपला विचार करून ते प्रत्यक्षात उतरून आदिवासींचे कल्याण करणे गरजेचे आहे. आदिवासींचा शैक्षणिक विकास वाढला पाहिजे. आदिवासी विद्यार्थी शिक्षणासाठी दुर्गम भागातून येतात त्यांना प्रवेश मिळाला पाहिजे.  एकात्मिक आदिवासी विकास मार्फत त्यांना लाभ मिळणे गरजेचे आहे. आदिवासींचा इतिहास पुढे आलेला नाही. त्यासाठी काही संदर्भ वापरून, माहिती जमा करून  आपण लिखाण करून पुस्तके लिहून आदिवासींचा इतिहास जगासमोर मांडू शकतो. विविध कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवली गेली पाहिजे तसेच या कौशल्यांचा विद्यार्थ्यांनी वापर केला पाहजे असे प्रतिपादन केले.  

पहिल्या सत्रात मा.  चैत्राम पवार यांनी "आदर्श गाव बारीपाडा आणि आदिवासी समुदाय विकास" याबाबत मार्गदर्शन केले.  दुसऱ्या सत्रात मा. इशिता चव्हाण (आगा खान ग्रामीण सहाय्य कार्यक्रम, भारत), मा. त्रिलोक गुप्ता (आगा खान ग्रामीण सहाय्य कार्यक्रम, भारत) यांनी "आदिवासींची उपजीविका" याबाबत मार्गदर्शन केले. तिसऱ्या सत्रात मा. डॉ. वैभव सबनीस ( डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महाविद्यालय, धुळे) यांनी "जीवन कौशल्य" या विषयावर मार्गदर्शन केले. चौथ्या सत्रात मा. डॉ. मोहन पावरा  (माजी व्यवस्थापन परिषद सदस्य - कबचौउमवि, जळगाव) यांनी "आदिवासींचे सामाजिक-आर्थिक प्रश्न" याबाबत मार्गदर्शन केले. 

कार्यशाळेचे समन्वयक म्हणून प्रा. डॉ. रघुनाथ महाजन, प्रा. डॉ. दिलीप घोंगडे यांनी कार्यशाळेचे आयोजन केले. प्रा. डॉ. फरीदा खान, प्रा.डॉ. गोपाळ निंबाळकर, प्रा, डॉ. प्रीती वाहने, प्रा. डॉ. मेघावी मेश्राम, प्रा. डॉ. सुदाम राठोड तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे कार्यशाळेच्या आयोजनात सहकार्य लाभले. कार्यशाळेत जळगाव, नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील एकूण १०० आदिवासी विद्यार्थी व प्राध्यापक सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments

|