Header Ads Widget


वक्फचा दणका..!! जमीन बळकावणाऱ्या विरोधात आता फौजदारी गुन्हे,नांदेड येथे पहिला गुन्हा ..


औरंगाबाद  / प्रतिनिधी 

 महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या भूखंड बळकावणाऱ्या विरोधात आता थेट फौजदारी गुन्हे नोंदविण्याचा निर्णय झाला आहे.नांदेड येथील दर्गाह यातीमशाह अशुरखाना,कब्रस्तान चौक येथील मधील बेकायदेशीररीत्या जमीन हस्तांतरण व विक्री करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्यकार्यकारी अधिकारी श्री मोईन ताशीलदार यांनी काढले आहे.वक्फ मंडळाच्या या कडक धोरणा मुळे राज्यातील वक्फ भूखंडाचे श्रीखंड खाणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

 मुख्यकार्यकारी अधिकारी श्री ताशीलदार यांनी मंडळाचा पदभार सांभाळल्या नंतर बेकायदेशीररित्या जमिनीचा ताबा घेऊन कब्जा व विक्री करणाऱ्यांची चौकशी सुरू केली.यातील नांदेड येथील दर्गाह यतीमशाह अशुरखाना व कब्रस्तान मधील ११५ बाय ९० फूट जागा वक्फ मंडळात नोंद आहे.असे असतांना वक्फ अधिनियम १९९५ च्या कलम ५६ अन्वये तीन वर्षांचा भाडेकरार करण्यास मान्यता देण्यात आली होती.सदर भूखंड ताब्यात देण्याची प्रक्रिया अमलात आणत असतांना गैरअर्जदार मोहम्मद अय्युब मोहमद खाजा व मो.अली गौसखान खादरी यांनी सदर भूखंड शंभर रुपयाच्या नोटरी करून वक्फ मालमत्ता संगनमताने १९,३०,०००/-रुपयात २१-१२-२१ बेकायदेशीररित्या हस्तांतरण व विक्री केल्याचे समोर आले.या संदर्भात दोघांनी दुकानाचा ताबा घेतल्याची तक्रार ही मंडळा तर्फे करण्यात आली होती.

उपरोक्त प्रकरणाची सखोल चौकशीचे आदेश नुकतेच श्री.ताशीलदार यांनी दिले होते.या बाबत वक्फ मंडळा कडून मोहम्मद अय्युब व अली खादरी यांना कलम ५२ (अ) तरतुदीनुसार जागा ताब्यात घेण्यास व फौजदारी कारवाई का करण्यात येऊ नये,बाबत नोटीस देण्यात आली होती.वारंवार खुलासा करण्याची रीतसर संधी दिल्या नंतर ही संबंधितांनी वेळेत खुलासा सादर केला नाही.त्यामुळे गैअर्जदार यांनी मालमत्ता बेकायदेशीररित्या हस्तांतरण व ताबा घेतल्याचे निष्पन्न झाले.

वक्फ मंडळाच्या पूर्व परवानगी शिवाय वक्फ मिळकतीचे हस्तांतरण तसेच बेकायदेशीर व्यवहार केल्यास अधिनियम १९९५ च्या कलम ५२ अ(१)अन्वये दोन वर्षा पर्यंत सदर व्यक्ती शिक्षेस पात्र होतो.विशेष म्हणजे औरंगाबाद येथील ५ जुलै२०२३ रोजी झालेल्या बैठकीत मुख्यकार्यकारी अधिकारी यांना ५१,५२, व ५२(अ) अंतर्गत चौकशी व योग्य कार्यवाहीचे अधिकार देण्यात आले आहे.वरील प्रकरणी मुख्यकार्यकारी अधिकारी श्री.मोईन ताशीलदार यांनी प्रकरण गांभीर्याने हाताळून जिल्हा वक्फ अधिकारी,नांदेड यांना आदेश दिले आहे.वक्फ मालमत्ता फसवणूकीने संगनमताने हस्तांतरण व ताबा मिळविल्या प्रकरणी मोहम्मद अय्युब व मोहमद अली यांच्या वर फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे.

वक्फ मालमत्ता बेकायदेशीररीत्या ताबा घेणे,हस्तांतरण व विक्री करणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून या पुढे राज्यातील ज्या लोकांनी असे कृत्य केले असेल त्यांच्या वर थेट फौजदारी कार्यवाही करण्यात येईल.या संदर्भात लोकांनी सजग राहून वक्फ मालमत्तांचे बेकायदेशीररित्या खरेदी-विक्री,हस्तांतरण करण्यात आलेल्या प्रकरणी तक्रार द्यावी,असे अहवाहन ही वक्फ मंडळाचे मुख्यकार्यकारी अधिकारी श्री.मोईन ताशीलदार यांनी केले आहे.तक्रार आल्यासअश्या भूखंड माफियांची गय केली जाणार नाही,अशी हमी ही शेवटी श्री.ताशीलदार यांनी दिली.

Post a Comment

0 Comments

|