LivenationNews/प्रतिनिधी
जेष्ठ जीवनवादी लेखक, समतावादी विचारवंत, संघर्षशील शेतकरी नेते, व्यासंगी पत्रकार, संपादक चंद्रकांत वानखडे यांची 17 व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 4 व 5 फेब्रुवारी रोजी वर्धा येथे हे संमेलन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आमने-सामने आयोजित करण्यात आले आहे. आज नागपूर येथील पत्रकार परिषदेस विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी, संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रा. नितेश कराळे व मुख्य संयोजक डॉ. अशोक चोपडे यांनी ही घोषणा केली.
चंद्रकांत वानखडे हे समकालीन मराठीतील जीवन व लेखन यात द्वैत न मानणारे महत्वपूर्ण लेखक आहेत. शेतकरी आत्महत्यासंदर्भातील त्यांचे लेखन 1986 च्या साहेबराव करपेंच्या पहिल्या आत्महत्येपासून महाराष्ट्राने पाहिले आहे. 'असे छळले राज बंद्याना', 'एक साध्या सत्यासाठी' या आपल्या पुस्तकांपासून ते अलीकडील 'पुर्नविचार' तसेच 'गांधी का मरत नाही?' या सुप्रसिद्ध वैचारिक पुस्तकापर्यंत त्यांनी स्पष्टपणे फॅसिझमविरोधी, जीवनवादी, समतामूलक, धर्मनिरपेक्ष लोकशाहीवादी भूमिका सातत्याने मांडली आहे. मराठी आत्मकथनाच्या इतिहासात 'आपुलाचि वाद आपणांसी' या त्यांच्या आत्मकथनाचे नाव सोनेरी अक्षरात कोरले गेले आहे. शेतीमालाचा रास्तभाव आणि मराठवाडा विद्यापीठ नामांतर या महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील दोन ऐतिहासिक लढ्यांमध्ये त्यांनी दिलेले योगदान महाराष्ट्र विसरणार नाही.
ब्राह्मणी, भांडवली, पुरुषत्ताक मूल्यसंस्कृतीच्या विरोधात विद्रोही सांस्कृतिक चळवळ 1999 पासून महाराष्ट्रभर कार्यरत आहे. महात्मा जोतिराव फुले यांनी ग्रंथकार सभेस पाठविलेले पत्र हा विद्रोहीचा वैचारिक पाया आहे. न्या.म.गो. रानडेंनी ग्रंथकार सभेत सहभागी होण्याचे निमंत्रण म. जोतीराव फुले यांना दिले; तेव्हा म. फुलेेंनी म्हटले होते की, तुमच्या ग्रंथांमध्ये अखिल मानवाचे हित होईल याचे बीज नाही. फुलेंनी उंटावरून शेळ्या वळणार्या घालमोड्या दादाच्या त्या संमेलनात सहभागी होण्यास ठाम नकार दिला होता. आमचे ग्रंथकार तयार होतील, तेव्हा ते स्वाभिमानाने आपली संमेलने भरवतील असेही म्हटले होते. ग्रंथकार सभेचे 20 व्या शतकातील स्वरूप म्हणजे अ.भा. मराठी साहित्य संमेलन आहे. ब्राह्मणी, भांडवली, पुरुषत्ताक मूल्य आणि विषमतावादी सांस्कृतिक विचारांचा विषारी प्रचार-प्रसार करणार्या संस्था, संघटना व संमेलनाच्या विरोधात भूमिका घेण्याचा फुलेआंबेडकरांचा संदेश मानून आपण विचार व संघटित कृती केली पाहिजे. अ. भा. साहित्य संमेलन आणि महामंडळ यांचा आजवरचा व्यवहार हा विषमतावादी राहिला आहे. चिपळूणच्या साहित्य संमेलनात परशुरामाची मूर्ती स्टेजवर ठेवण्याचा आग्रह, ठाण्यात संमेलन स्मरणिकेत महात्मा यांच्या खुन्याचा पंडित नथुराम’ असा उल्लेख करणे असेल. संयुक्त महाराष्ट्राचे सेनानी शाहीर अण्णाभाऊ साठे, शा. गव्हाणकर, शा. अमर शेख, शा. वामनदादा कर्डक, क्रांतीसिंह नाना पाटील, भाई उद्धवराव पाटील, कर्मवीर दादासाहेब गायकवाड, शा. यशवंत चकोर यांना संमेलनासाठी साधे निमंत्रणही न देणे; उलट अनेक दांभिकांना अध्यक्षपदे बहाल करणे, स्वातंत्र सैनिक व थोर गांधीवादी नयनतारा सहेगल यांना यवतमाळला उद्घाटक म्हणून बोलावून नंतर अपमानित करणे, अशी अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या विषमतावादाची असंख्य उदाहरणे आहेत. किंबहुना विषमतावादी सांस्कृतिक राजकारणाचे ते मूखंडच आहे.
इतिहासाचे विकृतीकरण, शिक्षणाचे ब्राह्मणीकरण, राज्यघटना बदलाचे राजकारण, समाजाचे जातीजमातीत विभागीकरण, लैंगिकतेचे वस्तुकरण, आदिवासींचे वनवासीकरण यांतून भारतीय संस्कृतीच्या मुळावर हल्ले चढवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर कला साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रात कष्टकरी व वंचितांच्या, शेतकर्यांच्या बाजूने अभिव्यक्तीच्या वाटा मोकळ्या करणारी विद्रोही साहित्य संमेलने 1999 पासून आपण आयोजित करीत आलो आहोत. समता, लोकशाही व आत्मसन्मानाची एक घनघोर लढाई, मराठी भाषिक संस्कृतीच्या क्षेत्रात लढली जात आहे.विद्रोही सांस्कृतिक चळवळ जीवनाच्या सर्व क्षेत्रात समतावादी संस्कृती साहित्य विचारांचा पुरस्कार करते. विद्रोही साहित्य चळवळीच्या वतीने आजवर मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती, सोलापूर, नंदुरबार, वाशी (नवी मुंबई), पुणे, मनमाड, धुळे, परभणी, बुलढाणा, हिंगोली, नाशिक, उदगीर इत्यादी ठिकाणी साहित्य संमेलने, एक आंतरराज्य (निपाणी), एक विद्रोही महिला साहित्य संमेलन (पुणे) यशस्वीपणे आयोजित करण्यात आली आहे. कालकथित बाबुराव बागुल, कवी वाहरू सोनवणे, डॉ. यशवंत मनोहर, डॉ. अजिज नदाफ, आत्माराम कनिराम राठोड, कॉ. तारा रेड्डी, तुळसी परब, डॉ.आ.ह. साळुंखे, संजय पवार, जयंत पवार, उर्मिला पवार, डॉ. श्रीराम गुंदेकर, विमल मोरे, डॉ. प्रल्हाद लुलेकर, डॉ. प्रतिभा अहिरे. डॉ. आनंद पाटील, गणेश विसपुते यांसारख्या सर्जनशील साहित्यिकांनी विद्रोही साहित्य संमेलनाची अध्यक्षपदे भूषविली आहेत. बहुभाषिकता, धार्मिक व सांस्कृतिक बहुविधतेसह संविधानाचा सन्मान हे या 17 व्या अ.भा. विद्रोही साहित्य संमेलनाचे वैशिष्ट्ये आहे. विद्रोही मराठी साहित्य संमेलन वर्धा शहरात भरत आहे. सत्यशोधक, गांधीवादी, आंबेडकरी वारसा असलेल्या वर्धा शहरातसंतश्रेष्ठ गाडगेबाबा व तुकडोजी महाराज, पंजाबराव देशमुख यांच्या समतावादी परंपरांच्या पार्श्वभूमीवर हे संमेलन होणार आहे. सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव, स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव आणि राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी वर्षास समर्पित हे संमेलन ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. म्हणूनच अघोषित आणीबाणीला नकार देण्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आणि बहुजनांच्या समता संस्कृतीचा आवाज बुलंद करण्यासाठी, संविधान सन्मानासाठी, या संमेलनात सहकुटुंब सहभागी होण्याचे आवाहन आज पत्रकार परिषदेत करण्यात आले.
एकमय राष्ट्रनिर्मितीच्या दिशेने हे मुख्य सूत्र असणार्या 17 व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष असलेले व गांधी का मरत नाही? या बहुचर्चित वैचारिक ग्रंथाचे लेखक चंद्रकांत वानखडे यांचा जन्म 1 मार्च 1951 रोजी अमरावती येथे झाला आहे. संत गाडगेबाबा, पंजाबराव देशमुख यांचे वैचारिक संस्कार त्यांच्यावर झाले आहेत. शब्द आणि सत्य यात अंतर निषिद्ध मानणार्या चंद्रकांत वानखडे यांचे जीवन म्हणजे शेतकरी कार्यकर्त्याचा सवेंदनशील म्हणूनच संघर्षशील प्रवास आहे. जयप्रकाश नारायणांच्या आणीबाणी विरोधी चळवळीत भाग घेतलेल्या वानखडे यांची छात्र युवा संघर्ष वाहिनी, मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलन, शेतकरी संघटना, शेतकरी आत्महत्याविरोधी लढाई अशी प्रदीर्घ सार्वजनिक कारकीर्द महाराष्ट्राला परिचित आहे. 'अपघाताने' पत्रकारितेत आलेल्या वानखडे यांनी पुर्वी साप्ता. शेतकरी संघटक नंतर देशोन्नती, नवराष्ट्र, सकाळ अशा विविध दैनिकातून पत्रकार, संपादक म्हणून कार्य करत वैदर्भीय पत्रकारितेला नवा आयाम दिला आहे. सामान्यांच्या दु:खाला वाचा फोडत त्यांची पत्रकारिता संघर्षाचा आवाज बनली. चंद्रकांत वानखडे हे जयप्रकाश नारायण, एस. एम. जोशी. डॉ. बाबा आढाव, शरद जोशी, व्ही.पी.सिंग यांसारख्या राष्ट्रीय नेत्यांचे निकटचे पण चिकित्सक सहकारी राहिले आहेत.
आणीबाणी, शेतकरी आंदोलन अशा अनेक प्रसंगी त्यांनी तुरूंगवासही भोगला आहे आजही सनातन्यांच्या विरोधात, मोदी शहांच्या अघोषित आणीबाणीच्या विरोधात ते गांधी का मरत नाही? असा प्रश्न विचारत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जातीस्त्रीदास्यांताचा आवाज उंचावत आहेत. म्हणूनच कृतीशील विचारवंत सुधारक म्हणून महाराष्ट्र त्यांना ओळखतो.
थोडक्यात परिचय -
* जन्म 15 ऑक्टोंबर 1951 अमरावती
* शिक्षण- एम. ए. (अर्थशास्त्र)
* 1968- जयप्रकाश नारायणांच्या चळवळीतून सार्वजनिक जीवनाला प्रारंभ
* जातीस्त्रीदास्यअंताच्या, शेतकरी शेतमजुरांच्या विविध आंदोलनात आजतागायत सक्रीय
* माया कुलकर्णी यांच्याशी आंतरजातीय लग्न व मेटीखेडा या आदिवासी गावात वीस वर्ष कार्य
* लेखन- असे छळले राजबंद्याना- आणीबाणी विरोधी रिर्पोताजपर पुस्तक
* एका साध्या सत्यासाठी - शेतकरी आत्महत्येसंदर्भात लेखन
* पुनर्विचार- स्वत:शी केलेला मुक्तचिंतनपर संवाद
* आपुलाचि वाद आपणासी- शेतकरी कार्यकर्त्याचे पारदर्शीआत्मकथन
* 2000सालानंतर देशोन्नती, सकाळ, नवराष्ट्र इत्यादी दैनिकात विविध जबाबदार्या पेलल्या
आपले,
प्रा. प्रतिमा परदेशी (राज्याध्यक्ष) यशवंत मकरंद (सेक्रेटरी) किशोर ढमाले (संघटक) विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्र
प्रा. नितेश कराळे (स्वागतध्यक्ष) डॉ. अशोक चोपडे(मुख्यसंयोजक) कॉम.आर.टी.गावित (राज्य संघटक )रणजित गावित,अशपाक कुरेशी, मंनसारम पवार,गेवाबाई गावित ,शीतल गावित ,होमाबई गावित .
0 Comments