Header Ads Widget


महिला दिनानिमित्त नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे " ऑपरेशन अक्षता " या महत्वाकांक्षी उपक्रमाची सुरुवात..!!

8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त देशासह राज्यभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. पी.आर. पाटील यांच्या संकल्पनेतून बाल विवाह रोखण्याबरोबरच महिला व मुली हरविण्याच्या, अपहरण होण्याच्या, तसेच कौटुंबिक हिंसाचार तसेच महिलांसंबंधी घडणाऱ्या इतर घटनांना आळा घालण्यासाठी "ऑपरेशन अक्षता" या महत्वाकांक्षी उपक्रमाचा नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री यांचे हस्ते शुभारंभ नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक कायालयाच्या पटांगणात करण्यात आला. 


नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या " ऑपरेशन अक्षता " या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री यांनी, उपक्रमाबद्दल आपले मत व्यक्त करतांना, "ऑपरेशन अक्षता" हा नवीन उपक्रम असुन समाजोपयोगी आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक, पोलीस अंमलदार व आशा वर्कर यांची भुमिका महत्वाची आहे. नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांचे संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या "ऑपरेशन अक्षता" या मध्ये गावातील प्रत्येक नागरिकांनी सहभागी होवुन गावात बाल विवाह प्रतिबंदबद्दल जनजागृती करुन या उपक्रमास सहकार्य करावे असे आवाहन करुन त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. 


आदिवासी बहूल नंदुरबार जिल्ह्यात बालविवाह होणे, परंतु त्याबाबत कोणतीही तक्रार न होणे, ते विवाह झाल्याचे समोर न येणे यासारख्या गोष्टी घडत आहेत, हे मान्य करायला हवे. नंदुरबार जिल्ह्यातच नव्हे, तर सर्व देशभरात बाल विवाह ही गंभीर समस्या आहे. 18 वर्षापेक्षा कमी वयात मुलीचे लग्न झाल्यास त्याचे अनेक दुरगामी व दुष्परिणाम मुलीच्या जीवनावर पर्यायाने कुटुंबावर आढळून येतात. बाल विवाह हा त्यांच्या अधिकाराचे उल्लंघन असून त्याचे अनेक शारीरिक व मानसिक दुष्परिणाम होतात. बाल विवाह झालेल्या मुलींचा शारीरिक विकास तर पुरेसा झालेला नसतो अशा स्थितीत त्यांना गर्भधारणा झाली तर बाळाच्या पोषणासाठी आवश्यक असलेले शरीर व मन त्यांच्याकडे नसते. या सर्वांचा परिणाम बाळाच्या आरोग्यावर देखील होतो. त्यात दोन पेक्षा अधिक बाळंतपण झाली तर कुपोषणासारखी गंभीर समस्या निर्माण होते. 

बाल विवाह रोखणे ही समाज घटकातील प्रत्येकाची जबाबदारी असून गुन्ह्याच्या दृष्टीने विचार केला असता पोलीस अधिकारी म्हणून बाल विवाह रोखणे ही एक महत्वाची जबाबदारी आहे. वरील सर्व बाबींचा सांगोपांग विचार करुन नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या मार्फतीने " ऑपरेशन अक्षता " सुरु करीत आहोत. बाल विवाह रोखण्याबरोबरच महिला व मुली यांच्या हरविण्याच्या, अपहरण होण्याच्या, लैंगिक गुन्ह्यांच्या तसेच कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांबाबत देखील या उपक्रमाच्या माध्यमातून प्रभावी उपाययोजना करणे शक्य होणार आहे. तसेच जिल्ह्यात घडणारा प्रत्येक बाल विवाह रोखला जावून शेवटच्या घटकापर्यंत बाल विवाह विरोधी जागरुकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. तसेच हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी गांव पातळीवर आशा स्वयंसेवीका, पोलीस पाटील, सरपंच, प्राथमीक आरोग्य केंद्रातील परिचारीका व पोलीस बिट अंमलदार यांची भुमिका असणार आहे. गाव पातळीवर होणारे बाल विवाह या सर्व घटकांच्या माध्यमातून निश्चीतपणे रोखले जावू शकतात, असे प्रतिपादन नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांनी केले.

तसेच बाल विवाह विरोधी ठराव करणाऱ्या कोराई ग्राम पंचायतीचे सरपंच श्री. राजु तडवी, ग्रामसेवक श्री. गणेश वसावे, पोलीस पाटील श्री. अनिल वसावे आणि भुजगांव ग्राम पंचायतीच्या उपसरपंच श्रीमती कविता पावरा, ग्रामसेवक श्री. हेमंत राठोड, पोलीस पाटील श्री. दिपक पावरा यांचा देखील यावेळी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या वेळी अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना, जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या ऑपरेशन अक्षता या उपक्रमातून महिलांच्या सामाजीक जीवनावर होणाऱ्या परिणामाबाबत मार्गदर्शन केले. 

श्री. गोविंद चौधरी, जिल्हा आरोग्य अधिकारी, नंदुरबार यांनी आपल्या मनोगतात बाल विवाह     झाल्यास महिलांच्या शारीरिक आरोग्यावर काय परिणाम होतात. तसेच बाल विवाह या समस्येचे निराकरण झाल्यास कुपोषणासारखी समस्या देखील नष्ट होवू शकते असे मत व्यक्त केले.

श्री. प्रमोद पवार, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. नंदुरबार यांनी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांनी सुरु केलेल्या ऑपरेशन अक्षता या मोहिमेंतर्गत आशा स्वयंसेविका यांची भुमिका ही महत्वाची असून त्यांना या उपक्रमात सहभागी करुन घेतल्याबद्दल त्यांनी जिल्हा पोलीस दलाचे आभार मानले.

श्रीमती दीपमाला पाटील, अध्यक्षा, नंदुरबार तालुका पोलीस पाटील संघटना, श्रीमती निता देसाई, बाल कल्याण समिती अध्यक्षा, श्रीमती उषा वळवी, आशा स्वयंसेविका, निमगांव ता. जि. नंदुरबार, डॉ.श्रीमती तेजल चौधरी, लायन्स क्लब, नंदुरबार यांनीदेखील याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. 

सदर कार्यक्रमाच्या वेळी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, नंदुरबार श्री. पी.आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, पोलीस उप अधीक्षक (मुख्यालय), श्री. विश्वास वळवी, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सचिन हिरे, अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. संभाजी सावंत, श्री. प्रमोद पवार, अति.मुख्य कार्य.अधिकारी, नंदुरबार, श्रीमती निता देसाई, बाल कल्याण समिती अध्यक्षा, श्री. गोविंद चौधरी, जिल्हा आरोग्य अधिकारी, श्री.कृष्णा राठोड, महिला व बाल विकास अधिकारी, डॉ.श्रीमती तेजल चौधरी, लायन्स क्लब, नंदुरबार यांचेसह इतर अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सचिन हिरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments

|